
युद्धशास्त्रात एक प्रकार असतो माईंड गेम म्हणजे मानसिक युद्ध. यात प्रतिस्पर्ध्याला मानसिक पातळीवर खेळवण्यात येते आणि या खेळातील परिणामांवरून प्रत्यक्ष युद्धाचा निकाल ठरतो. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्यावरून काँग्रेस अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाशी मानसिक युद्ध खेळले, असे म्हणता येईल. अखेर अजय राय यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ही जागा मोदींसाठी सोपी केली, परंतु त्यावर रंगलेले राजकारण खुमासदार होते.
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी वाड्रा वाराणसी मतदारसंघात निवडणूक लढवणार का नाही, याबाबत निश्चित ठरत नव्हते. प्रियंका गांधी यांच्या गंगा यात्रेत सहभागी झालेल्या शालिनी यादव यांना तर समाजवादी पक्षाने वाराणसीतच उमेदवारी दिली. मात्र प्रियंका गांधी यांचा सस्पेन्स काही संपायचे नाव घेत नव्हता. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना छेडले असता, ‘थोडासा सस्पेन्स ही चांगली गोष्ट आहे,’ असे सांगून त्यांनी गूढ वाढवले. प्रियंका गांधी यांना याबाबत विचारले असता, पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण जरूर निवडणूक लढवू, असे सांगून त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात काँग्रेसलाच रस आहे की काय, असे वाटू लागले.
No comments:
Post a Comment