
पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करणे हा हेतू असतो. पैशाचे नियोजन असेच केले जाते. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे कशी होतील ? याचा विचार करणे म्हणजे पैशाचे नियोजन. ते नियोजन करण्याआधी आपल्याकडे किती पैसे आहेत हे बघावे लागते. त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पैशातून कोणते काम करायचे आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत याची माहिती घ्यावी लागते. पैसे कमी असतील आणि कामाची गरज मोठी असेल तर ? आता काय करावे असा प्रश्न पडतो. मग सुरू होते नियोजन. पैशाची गरज नीट तपासली जाते. काही वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्या कमी भावात मिळतील का ? याचा अंदाज घेतला जातो. काही ठिकाणी माणसे लावली जातात. माणसांनी करायची कामे कमीत कमी माणसात कशी होतील याचा विचार केला जातो. काटकसर करून आपल्या जवळ असलेल्या पैशातच ते काम कसे करून घेता येईल याची कोशीश केली जाते. त्यालाच म्हणतात नियोजन.
नियोजन करायला सुरुवात करतो तेव्हा एवढ्या पैशात हे काम होणे शक्यच नाही असे वाटत असते. पण काटकसरीचा विचार करायला लागतो. तसे ते काम तेवढ्या पैशात तर होतेच पण काही पैसे शिल्लकही राहतात. त्यामुळेच कोणताही व्यापारी आणि उद्योजक आपल्या जवळच्या साधनांचा आणि होणार्या खर्चाचा वापर बारकाईने विचार करीत असतो. शेतकरीवर्ग असे नियोजन करीत नाही. आपण पाण्याचा विचार करू. आपण शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देतो पण आपण देतो तेवढे पाणी त्या पिकाला आवश्यक आहे का? याचा विचार करीत नाही. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पीक चांगले येण्यासाठी भरपूर पाणी लागत नाही. नेमक्या शब्दात सांगायचे तर पिकांना ‘मोजकेच’ पाणी लागते आणि ‘वेळेवर’ लागते. आपण जे पीक घेतो, त्या पिकाच्या वाढीच्या कोणकोणत्या अवस्थांत त्यात पाणी दिले पाहिजे, याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि त्या त्या वाढीच्या अवस्थांत त्याला पाणी मिळेल याची योजना आखली पाहिजे. उगाच कधीही पाणी देत राहणे हा पाण्याचा गैरवापर आहे. या अवस्थेत सुद्धा आपण किती पाणी दिले पाहिजे याचा विचार करून तेवढेच पाणी दिले पाहिजे.